रत्नागिरी - राजा उदार झाला अन् शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली. ते रत्नागिरी जिल्ह्यात शेतीनुकसानाची पाहणी करण्यासाठी आले होते. चिंचखरी इथे नुकसानाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा दरेकर यांच्याकडे मांडल्या. यावेळी माजी खासदार निलेश राणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपये पॅकेजची घोषणा केली आहे. सरकारने जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारने केलं असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सांगितलं होतं की, कोरडवाहू जमिनीला 25 हजार रुपये हेक्टरी देऊ. तसेच 50 हजार बागायतीला देऊ, फळबागायतीला 1 लाख देऊ, मात्र सरकारने या वचनांची पूर्तता केली नसल्याची टीका दरेकर यांनी केली आहे.
भाजपाची संघर्षाची भूमिका कायम राहिल
ठाकरे सरकारने आपल्या वचनाचा भंग केला असून मदतीचा बनाव केला. शेतकऱ्यांच्या हाताला यातून काहीच लागणार नाही. मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात योग्य ती मदत पडत नाही, तोपर्यंत भाजपाची शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका राहिल, असं दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.