रत्नागिरी - राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र रत्नागिरीतील नागरिकांनी जमावबंदीचा आदेश झुगारत रस्त्यावर वर्दळ केल्यामुळे पोलिसांनी दुचाकीस्वारांवर कारवाई केली. त्यामुळे वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसला नागरिक गांभिर्याने घेत नसल्याचे चित्र रत्नागिरीत दिसून येत आहे.
जनता कर्फ्यूच्या दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीत रस्त्यांवर वर्दळ आणि रहदारी होती. राज्यातील इतर शहरांप्रमाणे रत्नागिरीत देखील आता नागरिक अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचे दिसून येत होते. राज्यात जमावबंदी लागू केल्यानंतरही नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. जिल्ह्यात खासगी बससेवा, रिक्षा बंद असताना देखील जिल्हा प्रशासनाच्या सूचनांकडे कानाडोळा करत वडाप सर्रास सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लोकांना या साऱ्या परिस्थितीचे गांभीर्य आहे का ? अद्याप देखील आपण कोरोनाबाबत गंभीर नाहीत का ? शिवाय, शासन आणि प्रशासनाने आणखी काय करावे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत. रस्त्यावर बाहेर पडलेल्या दुचाकीस्वारांची पोलीस प्रशासन कसून चौकशी करत आहे. हॅल्मेट व इतर कागदपत्रे नसतील तर दंड आकरण्यात येत आहे. निदान या कडक कारवाईमुळे तरी दुचाकीस्वार रस्त्यावर येणार नाहीत, अशी अपेक्षा पोलिसांना आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.