रत्नागिरी - रायगड जिल्ह्यातील महाड-बिरवाडी एमआयडीसीत दरोडा टाकून पसार झालेल्या अट्टल 3 दरोडेखोरांना खेड पोलिसांनी शनिवारी सिने स्टाईलने पाठलाग करून पकडले. मात्र, यातील एक दरोडेखोर नदीत उडी मारून पसार झाला आहे. या चोराने जेव्हा नदीत उडी मारली, तेव्हा पोलिसांनी देखील नदीत उडी मारली. मात्र, चोरटा पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.
पोलीस आणि चोर यांच्यात झालेला हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री ५ दरोडेखोरांनी महाड येथील एक दुकान, तीन सदनिका आणि एका घरावर दरोडा टाकून ते पसार झाले. त्यातील ३ दरोडेखोर खेडच्या दिशेने पळाले होते. त्यामुळे नाकाबंदी करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कशेडी घाट ते भरणे नाका येथे नाकाबंदी केली होती. तसेच खेड, खवटी रेल्वे स्टेशनवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नाकाबंदी कालावधीमध्ये तीन संशयीत आढळून आले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता, यातील दोन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले. तर एक नदीत उडी मारुन पसार झाला.
पकडण्यात आलेले दोघेही आरोपी हे मध्यप्रदेश येथील असून, दिनेश धनसिंग अलावा आणि जितेन भालसिंग मनलोई अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनाही रायगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.