रत्नागिरी - एकजूट काय असते ते दाखवून दिले आहे संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशीतील सहा गावांतील ग्रामस्थांनी. येथील सहा गावांनी एकत्र येत कोरोना विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे. या कामात ग्रामस्थांना साथ मिळाली आहे ती उद्योजक संजय भाताडे यांची. दादासाहेब सरफरे विद्यालयात हा विलगिकरण कक्ष उभारण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.24 जून) त्याचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोनाविरुद्ध ग्रामस्थांची एकजूट
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यात तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. जिल्ह्याची चिंता वाढवणारी बाब म्हणजे डेल्टा प्लस या नव्या विषाणूचे संगमेश्वर तालुक्यात तब्बल नऊ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर गावागावातही विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाबाधितांवर गावातच उपचार होण्यासाठी ग्रामस्थही पुढाकार घेताना पाहायला मिळत आहे. संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशीतल्या सहा गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत कोरोना विलगीकरण कक्ष उभारला आहे. दादासाहेब सरफरे संस्थेच्या विद्यालयाच्या शेवटच्या मजल्यावर हे विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. संस्थेने इमारतीचा एक मजलाच उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झाले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले कौतुक
सहा गावांनी एकत्र येत सुरु केलेल्या कोरोना विलगीकरण केद्रांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी पाहणी करत कौतुक केले. या कोरोना विलगीकरण केद्रांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य रोहन बने, पंचायत समिती सभापती जयसिंग माने, चिपळूणच्या माजी सभापती पूजा निकम, तहसीलदार सुहास थोरात आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्त्यांनी केली मदत
कोरोना विलगीकरण कक्ष उभारताना ग्रामस्थांच्या एकजुटीचे दर्शनही झाले. या एकजुटीला अनेकांची साथही मिळली. उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संजय भाताडे यांनी केंद्राला बेड, गाद्या, उश्या, ब्लँकेट आणि जेवणासाठीचे साहित्य अशी सुमारे सहा लाख रुपयांची मदत केली आहे.
अशी आहे व्यवस्था
या कोरोना विलगीकरण कक्षामुळे सहा गावातील सुमारे बारा हजार ग्रामस्थांना लाभ होणार आहे. या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी प्रत्येकी दोन असे चार तर बाल रुग्णांसाठी एक असे पाच स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. पन्नास सुसज्ज बेड उपलब्ध करण्यात आले असून एक मनोरंजन कक्षाची सुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा - अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा प्रस्ताव कार्यकारणीत पारित