रत्नागिरी - पुणे-मुंबई हायपर लूपचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले नसल्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. ज्या योजनांवर अतिरिक्त खर्च दिसत आहे, त्याचा आढावा घेऊन पुढे जाण्यासाठी काही कामे थांबवलेली आहेत. त्यामध्येच पुणे-मुंबई हायपर लूप असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. मात्र, ठाकरे सरकार फडणवीस सरकारचे सगळे प्रकल्प गुंडाळणार, अशी महाविकास आघाडीची चुकीची प्रतिमा विरोधकांकडून निर्माण केली जात असल्याचेही सामंत म्हणाले.
आम्ही समृद्धी महामार्ग पूर्ण ताकदीने पुढे नेण्याचे काम करत आहोत. त्यामुळे असे प्रकल्प बंद करण्याचा विषयच येत नसल्याचेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे. ते आज (शनिवार) येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंत्री सामंत पुढे म्हणाले, नव्याने कुणी हिंदूत्व स्वीकारावे, कोणी कुठला झेंडा आणावा हा त्यांचा वैयक्तिक पक्षाचा प्रश्न आहे. मात्र, पक्षाने मतदारांसमोर जावे निवडणुका लढवाव्यात यातून आपले खासदार, आमदार, जिल्हा परिषद किती निवडून येतात याच्यावर सगळे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर मनसेच्या अजेंड्याचा परिणाम किती झाला, हे सिद्ध होईल, असे म्हणत मनसेला त्यांनी टोला हाणला. तर राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) तपास म्हणजे भीमा-कोरेगाव प्रकरणी वेगळे राजकारण करण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतल्याचेही मंत्री सामंत म्हणाले.
हेही वाचा - भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास आता एनआयएकडे; केंद्र-राज्य आमने सामने