रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेत दुफळी माजल्याचे चित्र आहे. अनेक शिवसेना पदाधिकारी रिफायनरीच्या समर्थनार्थ उघड भूमिका घेताना दिसत आहेत. शिवसेनेने काहींवर कारवाई देखील केली आहे. मात्र, शिवसेनेतीलच पदाधिकारी प्रकल्पाच्या समर्थनार्थ पुढे येत असल्याने शिवसेनेवर दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका होत आहे. त्यामुळेच शिवसेना पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी 1 मार्चला राजापूरमधील डोंगर येथे जाहीर सभा घेणार आहे. शिवसेनेची भूमिका बदलली नसून, रिफायनरीला विरोध किती आहे हे सभेच्या माध्यमातून दाखवून देणार असल्याची माहिती राजापूरचे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी दिली.
रिफायनरी प्रकल्पाकाचे काही स्थानिक शिवसेना नेते समर्थन करत आहेत. त्यावरून शिवसेनेवर दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका होत आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील नाणार होणार नाही अशी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. पण तरीही शिवसेनेचे काही स्थानिक नेते, विभागप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य नाणारचं समर्थन करत आहेत. त्यामुळे शिवसेनेची भूमिका काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच राजापूर तालुक्यातील डोंगर इथे 1 मार्च रोजी सभा घेऊन शिवसेना रिफायनरीला विरोध किती आहे हे दाखवून देणार आहे. 90 टक्के लोकांचा विरोध आहे. मात्र, तरीही समर्थक विरोध नसल्याचे दाखवत आहेत. त्यामुळे 1 मार्चला सभेचे आयोजन केल्याची प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारी तात्या सरवणकर यांनी दिली.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होणार असून, शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी या सभेला उपस्थित राहणार आहेत. शिवसेना अद्याप देखील आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यात कोणताही बदल नाही हे यावेळी जाहीरपणे सांगितले जाणार आहे.