रत्नागिरी - महसूल विभागाने ४ दिवसांपूर्वी करजुवे परिसरातून सक्शन पंपासह बोटी जप्त केल्या होत्या. मात्र, वाळूमाफियांनी पोलीस पाटलाच्या घरासमोरून जप्त करण्यात आलेली बोट सक्शनपंपासह रातोरात पळवली. याप्रकरणी ई टीव्ही भारतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तहसील प्रशासनाकडून करजुवेच्या पोलीस पाटलांना नोटीस बजावण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे परिसरातल्या वाळूमाफियांच्या दबंगगिरीप्रकरणी अखेर प्रशासनाला जाग आली आहे. ई-टीव्ही भारतने या प्रकरणी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महसूल विभागाने ४ दिवसांपूर्वीच वाळू माफियांवर कारवाई केली होती. या कारवाईत सक्शन पंप आणि बोटी जप्त केल्या होत्या. त्यानंतर वाळू माफियांनी धाडस दाखवत पोलीस पाटलांच्या घरासमोर लावलेली एक बोट सक्शन पंपासह चोरली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ई टीव्ही भारतने या बातमीचा पाठपुरावा केला. ही बातमी लावून धरत वाळूमाफियांच्या दबंगगिरीचा भांडाफोड केला.
ई-टीव्हीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली. या प्रकरणी संगमेश्वरच्या तहसिलदारांनी पोलीस पाटलांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता या नोटीशीनंतरतरी बोट पळवणाऱ्या वाळू चोरांना चाप बसण्यास मदत होईल.