रत्नागिरी- नाणार रिफायनरी प्रकल्प कोणीही लादण्याचा प्रयत्न करू शकणार नाही. याबाबत उद्धव साहेबांची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे. नाणार विषय संपलेला आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
नाणार रिफायणरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेची आज राजापूरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत सामंत यांनी सदर प्रतिक्रिया दिली. मागणी करणारे कोण आहेत, ज्यांचा थेट संबंध गुजरातशी आहे. ज्यांना कोणी जमिनी मिळवून दिल्या आहेत ते या प्रकल्पाचे दलाल आहेत. दलालांची चौकशी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, नाणार प्रकरणी खोटेनाटे गैरसमज पसरवत असलेल्यांसाठी गृहखाते सक्षम आहे, असा इशारा सामंत यांनी दिला. या सभेसाठी गर्दी पाहिल्यानंतर काही लोकांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले असतील. मी राष्ट्रवादीतल्या वरिष्ठांशी बोललो आहे. त्यांनीही याप्रकरणी शिवसेना जी भूमिका घेईल तीच राष्ट्रवादीची भूमिका असेल, असे मला सांगितले असल्याचे सामंत म्हणाले.
या प्रकल्पाबाबाबत रात्नागिरीतून राष्ट्रवादीकडून कोण काय बोलत आहे याकडे दुर्लक्ष करा. शेतकऱ्यांना भिकेला लावण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर खपवून घेतला जाणार नाही. आजची गर्दी बघून शहाने व्हा, असा इशाराही सामंत यांनी शिवसेनेतील रिफायनरी समर्थकांना दिला. तसेच रिफायनरीचे समर्थन करणाऱ्यांनी जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी काय केले याची आधी उत्तरे द्या, असा सवालही सामंत यांनी केला आहे.
हेही वाचा- रिफायनरीवरून वातावरण तापले, रिफायनरी समर्थकांची सोमवारी जाहीर सभा