रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरीत जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील लाखो घरांचे नुकसान झाले असल्याने अनेक लोक बेघर झाले आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरीत सर्वाधिक फटका हा दापोली तालुक्यातील हर्णे आणि पाजपांढरी गावाना बसला आहे. या दोन्ही गावातील जवळपास प्रत्येक घराला वादळाचा फटका बसला आहे. यातही पाजपांढरी गावातील चौगुले कुटुंबीयांनी जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड अंगावर काटा आणणारी आहे.
हेही वाचा... 'निसर्ग'चे तांडव : रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे शेकडो कोटींचे नुकसान
निसर्ग चक्रीवादळाने परिसरात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. असे असले तरिही वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे झालेले नुकसान लवकर भरून निघणार नाही. त्यातही अनेकांची घरे पडली असल्याने आणि छप्पर उडून गेले असल्याने ते आता लगोलग दुरुस्त करणे नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे आहे.
जीव वाचवण्यासाठी चौगुले कुटुंबीयांनी केली जीवापाड धडपड...
पाजपांढरी गावातील चौगुले कुटुंबाच्या घरावर आज छप्पर नाही. तसेच ते केव्हा होईल, याची शक्यता देता येणार नाही. निसर्ग चक्रीवादळाने दर्शन चौगुले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सर्वस्व हिरावून नेले आहे. मात्र, ज्यावेळी वादळ आले त्यावेळी या कुटुंबीयांनी जीव वाचवण्यासाठी आणि घरातून बाहेर पडण्यासाठी केलेली धडपड अंगावर काटा आणणारी आहे.
...तर आज आम्हाला आई दिसली नसती - दर्शन चौगुले
'वादळ सुरू झाले तेव्हा कोणत्याही दरवाज्याने बाहेर पडू शकत नाही, अशी स्थिती होती. त्यामुळे घरातील खिडकीतून 7 जण बाहेर पडले. त्यामध्ये पाच महिन्याच्या मुलाचा समावेश होता. मात्र, आईला घरातून बाहेर काढताना थोडा जरी उशीर झाला असता, तर मात्र मोठा अनर्थ झाला असता. याचे कारण आईला घरातून बाहेर काढले आणि काही सेकंदात घराचे सगळे छप्पर खाली कोसळले.' असे दर्शन चौगुले यांनी सांगितले.
दरम्यान, निसर्ग कोपला की काय होऊ शकते? हे हर्णे, पाजपंढरी येथील गावांतील दृश्य पाहिल्यावर लक्षात येते. घरांचे झालेले अतोनात नुकसान, सर्व संसार उपयोगी साहित्यांची झालेली हानी, भिजून गेलेले धान्य, घराचे उडून गेलेले छप्पर यामुळे येथील नागरिकांसमोर आता जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.