रत्नागिरी - कितीही विरोध होवू द्या मात्र, वाटेल ती किंमत मोजू पण रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करणार म्हणजे करणारच, अशी आक्रमक भूमिका भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी मांडली आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासह केंद्र आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये कररूपाने कोट्यावधी रूपये जमा करणार्या रिफायनरी उभारणीला शिवसेनेचा नव्हे तर, एकट्या खासदाराचा विरोध आहे. त्या खासदाराला रिफायनरीचा अर्थ माहित आहे का? असा सवाल उपस्थित करत खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.
राजापूर तालुक्यातील धोपेश्वर-बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित असून त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्यावतीने स्वागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांनी संबोधित केलं. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन, उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, शहराध्यक्ष विवेक गुरव, महिला नेत्या उल्का विश्वासराव, अॅड. विलास पाटणे, महिला महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष श्रृती ताम्हणकर यांच्यासह मोठ्यासंख्येने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राणे म्हणाले की, अमेरीकेतील एका राज्यामध्ये तब्बल सत्तावीस रिफायनरी आहेत. मग, कोकणातील एका रिफायनरी उभारणीला एवढा विरोध का? या रिफायनरीला विरोध होत असताना रायगड जिल्ह्यामध्ये रिफायनरी नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मग, रायगड कोकणामध्ये येत नाही का? यावेळी रिफायनरीसह तालुक्यामध्ये आलेल्या विविध प्रकल्पांच्या विरोधात भूमिका घेणार्यांवर राणे यांनी जोरदार टिका केली. रिफायनरीच्या अनुषंगाने झालेल्या जमीन व्यवहारांकडे लक्ष वेधताना जमीनी कुणीही घ्या मात्र, रिफायनरीमध्ये रोजगार स्थानिकांना मिळाला पाहीजे अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.
यावेळी माजी आमदार जठार यांनी बोलताना रिफायनरी प्रकल्प झालाच पाहीजे अशी आक्रमक भूमिका मांडताना या प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाच्या आड येणार्यांना आडवे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घेवून रिफायनरीच्या अनुषंगाने मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे सांगितले.