रत्नागिरी - सचिन वाझे प्रकरणावरून माजी खासदार आणि भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारसह, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. जितेंद्र आव्हाडांना रश्मी शुक्ला यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे राणे म्हणाले.
प्रकरणाचे धागेदोरे कलानगरच्या बंगल्यापर्यंत जातील -
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीन असलेली गाडी का आणि कोणी उभी केली हे एनआयच्या तपासात पुढे येईल. हे प्रकरण कोण शिजवत होते याचे धागेदोरे निश्चित कलानगरच्या बंगल्यापर्यंत(मुख्यमंत्री उद्धव ठाकेरे यांचे मातोश्री हे निवासस्थान कलानगरला आहे) जातील, असे म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेला टार्गेट केले आहे.
जितेंद्र आव्हाडांची उगाच वळवळ सुरू -
फोन टॅपिंग प्रकरणावरून पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत, असा आरोप करणाऱ्या मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील निलेश राणेंनी टीका केली. जितेंद्र आव्हाड कुणाचे एजंट आहेत? जितेंद्र आव्हाडाना नैतिक अधिकार आहे का? असे प्रश्न राणे यांनी उपस्थित केले. घरात इंजिनिअरला खेचून आणून मारणारे हे मंत्री आहे. कुठल्या आधारावर हे एका महिला अधिकाऱ्यावर आरोप करत आहेत. त्यांना फुकटात मंत्रीपद मिळाले आहे म्हणून, त्यांची उगाचच वळवळ सुरू आहे, असे निलेश राणे म्हणाले.