रत्नागिरी - जिल्ह्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकरणी सरकारकडून नेमण्यात आलेली सुकथनकर समिती येत्या ५ आणि ६ फेब्रुवारीला रत्नागिरीत येणार आहेत. मात्र, या दौऱ्यावर वादाचे सावट पडू लागले आहे. कोणतीही समिती आली, तर आम्ही उधळवून लावू, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. गुरुवारी रात्री रत्नागिरीत झालेल्या पक्षाच्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे.
प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकरणी सरकारकडून सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची रचना करण्यात आली आहे. सुकथनकर यांच्यासह समितीमध्ये डॉ. श्रीरंग कद्रेकर ( माजी कुलगुरू, केकेव्ही), ज्येष्ठराज जोशी (आयसीटीचे माजी संचालक) यांचा समावेश आहे. दरम्यान या समितीचे सदस्य ५ आणि ६ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी पावणेसहा यावेळेत रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
ही समिती प्रकल्पाशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांचे म्हणणे ऐकून घेवून आपले अभिप्राय सादर करणार आहे. या समितीच्या दौऱ्याबाबत निलेश राणे म्हणाले की 'अशी समिती पाठवून सरकारला वातावरण बिघडवायचे आहे का? इथे लोक स्वतःला उद्धवस्त करून घ्यायला तयार आहेत. मात्र, प्रकल्पाला कधी होकार देणार नाहीत. एवढे असूनसुद्धा तुम्ही लोकांना का चिडवताय? लोकांना का? गृहीत धरताय की लोक काही करणार नाहीत, असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना काही करणार नाही, हे आम्हाला कळलेले आहे. शिवसेना ही दुतोंडी आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर यावेळी प्रहार केला. दरम्यान ही समिती या ठिकाणी येऊ नये, यासाठी मी स्वतः राणे साहेबांशी बोलणार आहे. मी मुख्यमंत्र्यांना ही समिती या ठिकाणी न पाठवण्यासाठी पावले उचलावीत, अशी विनंती करेन, तरी सुद्धा ही समिती इथे आली तर गनिमी काव्याने ज्या काही गोष्टी करायच्या आहेत. त्या आम्ही करणारच, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. त्यामुळे या सुकथनकार समितीच्या दौऱ्यावर आता वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.