रत्नागिरी - ज्यांना आमच्या कुटुंबातील एक सदस्य मानत होतो. ते पक्ष सोडून गेल्याने दुःख तर आहेच पण त्यांच्या जाण्याने माझे कोणतीही राजकीय नुकसान झालेले नाही. त्याउलट निवडणूकीच्या ४८ तास आधी असे नेमके काय घडले की त्यांना पक्ष सोडावासा वाटला, असा सवाल करत मंगेश शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशाचा शिवसेनेला फायदा होण्यापेक्षा लोकं शंकाच अधिक उपस्थित करतील, असे प्रतिपादन माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी केलं आहे.
महाराष्ट्र्र स्वाभिमान पक्षाचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट करत, शिंदे यांनी केलेले आरोप खोडून काढले. यावेळी बोलताना ते म्हणाले की मंगेश शिंदे हे कालपर्यंत माझा प्रचार करत होते. निवडणुकीच्या ४८ तासांपूर्वी असे काय घडले की त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. ते माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यामुळे त्यांच्यावर मी टीकाटिपणी करणार नाही. शेवटपर्यंत ते आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच राहितील, त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमच उघडे असतील.
निवडणुकीत उमेदवार म्हणून कधी भाषणाला उभे रहावे लागते, तर कधी प्रचारात व्यस्त असतो. या गडबडीत एखाददुसरा फोन राहून जातो, पण हे काही पक्ष सोडण्याचे कारण असू शकत नाही. मंगेश शिंदे हे ज्यावेळी कार्यकर्त्यांविरोधात रागवायचे, चिडायचे ते वाद मिटविण्यासाठी अनेकवेळा मी त्यांच्या घरी गेलो आहे. निवडणुकिच्या कामकाजामुळे गेल्या १५ दिवसात दुर्लक्ष झाले असेल ते मी मान्य करतो. पण 'बघून घेईन' हे वक्तव्य त्यांच्यासाठी नव्हते. यापूर्वीचा आमचा तालुकाध्यक्ष आता आमच्याबरोबर नाही. सध्या केस सुरू असल्याने त्याचे मी नाव घेऊ शकत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेला वाटत असेल की या पक्ष प्रवेशामुळे आम्ही फार मोठा पराक्रम केला आहे, तर तो गैरसमज आहे. मंगेश शिंदे यांच्या जाण्याने दुःख असले तरी माझे कोणतेही राजकीय नुकसान झालेली नाही. आमचे सर्व कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत असे, निलेश राणे यावेळी म्हणाले.