रत्नागिरी - वाढत्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.
नेमके काय आहे आदेशात
या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये होत असणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा उदा. कबड्डी, क्रिकेट, खो-खो, इतर यांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या पुर्वपरवानगी शिवाय भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय आठवडे बाजार, जनावरांचे बाजार भरवता येणार नाहीत. कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक किंवा धार्मिक समारंभ, साखरपुडा, मुंज, पूजा, आरती, नमाज इत्यादी ज्यामध्ये 50 च्या मर्यादेपर्यंत लोक एकत्रित येण्याची शक्यता आहे अशा कार्यक्रमांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. उद्याने, मोकळ्या जागा, मनोरंजन पार्क, क्रिडांगणे, समुद्र किनारे अशा ठिकाणी एकाच वेळी 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास या आदेशाद्वारे मज्जाव करण्यात आला आहे.
विनापरवाना जत्रा, यात्रा, ऊरुस भरविणेस मनाई
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे अटी शर्तींवर खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यात्रा, जत्रा, ऊरुस भरविण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज प्राप्त होत आहेत असे निदर्शनास आले आहे. तथापि यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, यात्रा, जत्रा, ऊरुस यांमधील फक्त धार्मिक विधी करण्यास 50 माणसांच्या मर्यादेत परवानगी देण्यात येत आहे. पण, यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्ह्यात विनापरवाना जत्रा, यात्रा, ऊरुस भरविण्यास मनाई करण्यात येत आहे.
रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी
रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र, यामधून अत्यावश्यक सेवेसाठी नेमण्यात आलेले अधिकारी किंवा कर्मचारी व वैद्यकीय कारणास्तव रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना मुभा राहील. या वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा - तुम्ही स्वच्छ होते तर लपले का होते, निलेश राणेंचा संजय राठोड यांना सवाल