रत्नागिरी - भाजप खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना सत्तेवर असली तरी सत्ता शिवसेनेकडे नाही. खरी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचा टोला नारायण राणेंनी लगावला. शुक्रवारी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फक्त नामधारी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री स्वत: कुठल्याच प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत. प्रशासन कसे चालवावे हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्र अधोगतीला जात असल्याची टीका राणेंनी केली. 'आमची सत्ता ऑन दि वे आहे' अशा शब्दांत त्यांनी आशावाद व्यक्त केला.
हेही वाचा - 'कावळ्याच्या शापाने काही गुरं मरत नाहीत'
शिवसेनेच्या दहा रुपयांच्या थाळीवर देखील राणेंनी हल्लाबोल केला. घरी जेवतात ते जेवण उद्धव ठाकरे जनतेला देतात का? असा उलट सवाल त्यांनी केला. मुंबईत कामगारांसाठी दहा रुपयांत ही थाळी योजना सुरु केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कोपऱ्यात सुरु केलेल्या या योजनेत सबसीडी आहे. यात उद्धव ठाकरेंचे योगदान नाही. सामान्य नागरिकांच्या खिशातून हे पैसे तिकडे जात आहेत. असा आरोप त्यांनी केला.
जयंत पाटील स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जयंत पाटील देतात, अशी टीका राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर केली.