रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील नाणार येथे रिफायनरी आणण्याच्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. त्या ठिकाणी प्रदूषण विरहीत दुसरा उद्योग येऊ शकतो, असे सूतोवाच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी झूम अॅपवरील पत्रकार परिषदेत केले आहेत. कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रदूषणविरहीत उद्योग आणण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली बैठक झाली होती. त्यावर आता अंतिम निर्णय होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळावा यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात प्रदूषणविरहीत प्रकल्प आणण्याचा निर्णय होत आहे. या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा उद्योग निर्मितीमध्ये महाराष्ट्रात अग्रेसर होणार आहे, असेही सामंत म्हणाले.
नाणार येथे रिफायनरी प्रकल्प येणार नाही हा शिवसेनेचा निर्णय आहे. तो विषय केव्हाच संपलेला आहे. त्याऐवजी नाणारला अन्य प्रदूषणविरहीत उद्योग येऊ शकतो. रिफायनरीला ज्यांचा पाठींबा आहे, ते स्थानिक आहेतच असे नाही. रोजगारासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यादृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सरकार विचार करत असल्याचे सामंत यांनी सांगितले.