रत्नागिरी - मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आपली व्यथा मांडणाऱ्या महिलेला शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दमदाटी केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, भास्कर जाधव यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण वडीलकीच्या नात्याने तो सल्ला दिलेला होता. मात्र, मला बदनाम करण्यासाठी हे जाणीवपूर्वक करण्यात आले असल्याची, प्रतिक्रिया जाधव यांनी दिली आहे.
'आरोपांना आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही'
आपली व्यथा मांडणाऱ्या स्वाती भोजने आणि आमचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांना आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही. मला त्या माझ्या भावाच्या मुलीसारख्या आहेत. स्वाती भोजने यांनी सर्वांची व्यथा मांडली, मीही त्यांना समजावले. पण काही लोकांनी जाणीवपूर्वक मी जे काही बोललो ते सर्व मोडून-तोडून दाखवलेले आहे. जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचे जाधव यावेळी म्हणाले. मी सध्या करत असलेले कामच विरोधकांना उत्तर देईल असेही जाधव यावेळी म्हणाले आहेत.