रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजनाचा आणि कामाचा फटका जनतेला बसत आहे. त्यामुळे भिक नको, पण कुत्रा आवर, अशी म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील जनतेवर आली आहे.
लांजा शहरातून जाणारा महामार्ग सध्या चिखल आणि खड्ड्यात गेला आहे. नागरिकांना चिखलातून महामार्ग शोधावा लागत आहे. या रस्त्यावर फक्त चिखल आणि चिखलच दिसत आहे. याच चिखलातून वाट काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र ठेकेदाराकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
खेडच्या जगबुडी नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा जोडरस्ता खचला. त्यामुळे मनसेने अधिकाऱ्यांना पुलाला बांधले. तर लांज्यातल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत शिवसेना आमदार राजन साळवींनीही ठेकेदाराला धारेवर धरले होते. त्यामुळे आता या चिखलामुळे देखील काही वेगळे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.