रत्नागिरी - नारायण राणेंची दखल घेण्याची आम्हाला आवश्यकता नाही. मराठीत म्हटले जाते, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, तसे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारला नारायण राणेंच्या वक्तव्याने कोणतीही बाधा येणार नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर केली आहे.
नारायण राणे यांनी रविवारी सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारवर जोरदार प्रहार केले. राणेंनी केलेल्या या टीकेला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर देत जोरदार टीका केली. नारायण राणे यांच्या पणवतीमुळेच देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली. त्यांची घसरलेली गाडी आधी नारायण राणे यांना सावरता येते की नाही ते पाहावे, असा टोला राऊत यांनी राणेंना लगावला.
आयुष्यभर ज्याने ठेकेदारी केली. दमदाटी करून पैसे उकळण्यचे काम केले, त्या नारायण राणेंना आता त्यांच्या या अज्ञातवासात त्यांचा भूतकाळ आठवत असेल. हे आठवत असताना त्यांची ही बडबड, मुक्ताफळे उधळणे सुरू असते. त्यामुळे त्यांची आम्ही दखल घेत नाही. त्यांची जागा या कोकणाने त्यांना दाखवून दिली आहे, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.