रत्नागिरी - सिंधुदुर्गमधील बड्या राजकीय नेत्याची रिफायनरी प्रकल्प परिसरात 300 एकर जमीन असल्यामुळेच हा रद्द झालेला प्रकल्प आणला जात आहे, असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला. ते आज राजापूर तालुक्यातील तारळ येथील जाहीर सभेत बोलत होते.
हेही वाचा - नाणार पुन्हा 'पेटणार'? मुख्यमंत्र्यांचे प्रकल्पावरून मोठे विधान...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल तारळ येथे आज जाहीर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी आपल्या जाहीर भाषणात 'रद्द झालेला प्रकल्प हा सिंधुदुर्गातील एका नेत्यासाठी आणला जात आहे. या नेत्याची 300 एकर जमीन या प्रकल्पात आहे. 300 एकर जमिनीचे तीनशे कोटी रुपये या प्रकल्पामुळे अडकल्याने हा सारा खटाटोप सुरू असल्याचे ते म्हणाले. वेळ येईल तेव्हा आपण या नेत्याचे नाव जाहीर करू, असेही राऊत यावेळी म्हणाले. त्यामुळे बडा नेता कोण याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
हेही वाचा - 'सेनेचा रिफायनरीला विरोध नाही, पण प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोध कायम'
राऊत म्हणाले, प्रकल्प समर्थक उमेदवाराला लोकसभेत या गावांमधून मिळालेल्या 298 मतांवरुन त्याची लायकी काय आहे, हे मुख्यमंत्र्यांनी तपासावे, असा उपरोधिक टोलाही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. एकूणच विधानसभा निवडणूक रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणात गाजणार एवढं मात्र नक्की.