रत्नागिरी - 'संभाजी राजे छत्रपतींचा आदर्श नारायण राणेंनी घेतला पाहिजे, असे माझे मत आहे', असा टोला खासदार विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणेंना लगावला आहे. आज (5 जून) लांजा येथे डेडिकेटेड कोविड केअर सेंटरचे उद्घाटन विनायक राऊतांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
'संभाजी राजे छत्रपती आणि नारायण राणे यांची तुलना होऊ शकत नाही'
खासदार संभाजी राजे छत्रपती आणि नारायण यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेबद्दल विनायक राऊत म्हणाले, की 'छत्रपती संभाजी राजे हे मोठं व्यक्तिमत्त्व आहे. ते आदरणीय असे व्यक्तिमत्व आहे. आम्ही सर्वच त्यांचा नेहमीच सन्मान करतो. मात्र संभाजीराजे आणि नारायण राणे यांची तुलना कधी होऊ शकत नाही. नारायण राणे यांच्यासारखा एक स्वार्थी राजकारणी ज्याप्रमाणे सतत पक्ष बदलून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. तशा प्रकारची कारकीर्द संभाजी राजेंची नाही. एक ध्येयवादी, विचारवादी आणि एखादे काम हाती घेतले की त्याच्या यशस्वीततेसाठी प्रयत्न करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. संभाजीराजेंचा आदर्श नारायण राणेंनी घेतला पाहिजे, असे माझे मत आहे'.
फडणवीस-दरेकरांना दुसरे कामच काय - राऊत
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांवरही विनायक राऊतांनी टीका केली. 'विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सध्या काही कामधंदा राहिलेला नाही. दिल्लीवाल्यांनीही त्यांना बाजूला केलेले आहे. नितीन गडकरी यांनीही शहाण्याला समजवायचे तसे समजावले. मात्र, त्यांना ते मान्य नाही. त्यामुळे फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचे सध्या एकच काम आहे, ठाकरे सरकारवर टीका करणे. बाकी त्यांना काही काम नाही', असे विनायक राऊत म्हणाले.
हेही वाचा - मान्सून महाराष्ट्रात दाखल, येत्या दोन दिवसांत 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता