रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पावरून आता शिवसेनेतच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण आमदार राजन साळवी यांनी नाणारबाबत केलेल्या विधानावर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार राजन साळवी यांनी नाणारबाबत व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्या मताचा पक्षाशी किंवा महाविकास आघाडी सरकारशी काहीही संबंध नाही असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले होते आमदार साळवी -
शिवसेना आमदार राजन साळवी यांनी आज माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होतं की, नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना स्थानिकांच्या पाठीशी उभी होती आणि आहे. नाणारसारखा प्रकल्प विनाशकारी असल्याने त्याला स्थानिकांनी विरोध केला होता, त्यामुळे हा प्रकल्प शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द करून घेतला होता. म्हणूनच स्थानिक जनतेच्या पाठीशी शिवसेना उभी राहिलेली आहे. मात्र, कोकणात आज रोजगार नाहीत, नोकऱ्या नाहीत त्यामुळे प्रकल्प व्हावा अशा प्रकारची स्थानिक जनतेची मागणी पुढे येत आहे. भविष्यात हा प्रकल्प व्हावा अशी मागणी स्थानिकांची आली तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. स्थानिकांच्या रोजगारासाठी आणि स्थानिकांच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडी सकारात्मक निर्णय घेऊ शकते असे आमदार साळवी यांनी म्हटले आहे.
खासदार राऊत यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका -
याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की रिफायनरी हा प्रकल्प या परिसरातून कायमचा हद्दपार झालेला आहे. मात्र, राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी स्थानिकांची मागणी आल्यास मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार सकारात्मक विचार करेल असे मत व्यक्त केल्याचे ऐकिवात आले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी हा विषय संपलेला आहे. त्यांचे जे मत व्यक्त आहे ते केवळ आमदार राजन साळवी यांचे व्यक्तिगत मत आहे. त्या मताशी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीचे सरकार यांचा कोणताही संबंध नाही. हा प्रकल्प पुनश्च येण्याची आशा अजिबात नाही आणि तशा पद्धतीची स्वप्न कोणी पाहू देखील नये असे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.