रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खेड येथील सभेत राज्याच्या राजकारणापासून रिफायनरी प्रकल्पापर्यंत सर्वच गोष्टींवर भाष्य केले. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर राज यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कोकणातील पर्यटनस्थळे विकसित करून राज्याची अर्थव्यवस्था चालवता येईल. मात्र, व्यवसायाभिमुख राजकारण्यांना ते पटत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
शरद पवारांवर टीका : शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता. पण राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे धक्काबुक्की करत होते. ते पाहून पवारांना वाटले असेल की, त्यांनी राजीनामा दिल्यावर अजित पवार कसे वागतील सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घेतला असेल अशी टीका राज यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर केली आहे.
कोकणाची दुर्दशा : कोकणच्या दुर्दशेला तुम्हीच जबाबदार आहात. कोकणातील राजकारणी उद्योगपती आहेत, त्यांना पुन्हा पुन्हा निवडून देणार असाल तर वेगळे काय होणार? मुंबई-गोवा महामार्गाचे काम 2007 मध्येच सुरू झाले, पण तरीही काम पूर्ण होत नाही. कारण काम झाले नाही तरी निवडून येणार हे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना माहीत आहे मग काम कशासाठी? असे टीकास्त्र त्यांनी कोकणातील नेत्यांवर सोडले.
जमीनी राजकारण्याच्या मित्रांच्या घशात : समृद्धी महामार्ग 4 वर्षात पूर्ण झाला. मग मुंबई गोवा महामार्ग 15 वर्षात का पूर्ण झाला नाही? आपल्या पायाखालची जमीन नाहीशी होत असली तरी शेकडो एकरांचा व्यवहार होत आहे. हे कोकणातील माणसाला कसे कळणार? प्रकल्प कुठून येणार हे लोकप्रतिनिधींना कळते, मग ते जमिनीचे व्यवहार करून हजारपट नफा कमावतात. लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र तुमच्याकडून जमिनी घेतात. त्यावर कोणी बोलत नाही असे देखील राज ठाकरे म्हणाले.
6 भारतरत्न कोकणातील : कोकण ही प्रतिभावंतांची भूमी आहे. महाराष्ट्रात आलेल्या भारतरत्नांपैकी 6 भारतरत्न कोकणातील आहेत. अशा हुशार कोकणी माणसाचं काय झालं? एनरॉनच्या काळात दाभोळ असो, जैतापूर, नाणार, बारसू असो, अमराठी लोकांनी जमिनी घेऊन सरकारला किमतीला विकल्या. त्यांनी त्यातून बक्कळ पैसा कमावला. मात्र, माझा कोकणी माणूस तसाच राहिला. याबद्दल मला खूप वाईट, संताप वाटतो असे त्यांनी म्हटले आहे.
पवार महाराजांचे नाव घेत नाही : 2014 पूर्वी तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. त्यावर मी काय बोललो याचा विचार न करता राष्ट्रवादीने बार उठवला. राज ठाकरे कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगितले. महाराजांच्या पुतळ्याला मी विरोध करेन असे वाटते का? बरं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष शरद पवार हे जे बोलत आहेत. ते महाराजांचे नाव घेत नाहीत मात्र माझी बदनामी करतात. माझा मुद्दा होता की समुद्रातील महाराजांच्या पुतळ्यावर 10 हजार कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा महाराजांनी बांधलेले किल्ले हीच महाराजांची खरी स्मारके आहेत. त्यांचे संवर्धन आधी करायला हवे. पण माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आल्याचे दु:ख राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
बारसूमध्ये प्रकल्प करता येत नाही : कोकणाला निसर्गाने मुक्तहस्ते वरदान दिले आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, कोकण किती वैविध्यपूर्ण आहे. येथे पर्यटनाला चालना मिळाल्यास कोकण राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल, पण कोणालाच पर्वा नाही. युनेस्कोला बारसूमध्ये काताळशिल्पे सापडले आहे. युनेस्को जगभरातील अनेक वारसा वास्तू जतन करते. आता आम्हाला कोरीव काम सापडले आहे. त्यामुळे युनेस्कोच्या परवानगीशिवाय अशा हेरिटेज वास्तूभोवती कोणताही मोठा प्रकल्प किंवा मोठे बांधकाम करता येणार नाही.
कोकणातील नागरिकांनी धडा शिकवा : कातळशिल्पा भोवती तीन किलोमीटरपर्यंत कोणताही विकास प्रकल्प होऊ शकत नाही. बारसूच्या रिफायनरी प्रसल्प राबवता येणार नाही. त्यामुळे माझी कोकणातील बांधवांना विनंती आहे की यापुढे जमीन विकू नये अशी विनंती त्यांनी नागरिकांना केली. येथील लोकप्रतिनिधींचा उद्देश जमिनी हडप करून त्यातून भरपूर पैसा कमावण्याचा आहे, हे विसरू नका. तुमची फसवणूक करणाऱ्या या लोकांना धडा शिकवा अशी माझी हात जोडून कोकणातील जनतेला विनंती आहे. रिफायनरीजबाबत शिवसेनेची भूमिका योग्य आहे.