रत्नागिरी - कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकार गोंधळलेलं असल्याची टीका मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केली आहे. रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
कोविडच्या संकटात अनेक राज्यांनी लाॅकडाऊन उघडण्याच्या दृष्ट्रीने पावले उचलली. मात्र राज्य सरकारने महामारीतून बाहेर पडण्यासाठी ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. त्यामुळे आज लोकांमध्ये संभ्रमावस्था कायम असल्याचा घणाघाती आरोप नितिन सरदेसाई यांनी केला. दरम्यान, सरकारचा कोणत्याच गोष्टीवर पगडा किंवा नियंत्रण नाही. सरकारने मांड ठोकलेली जाणवत नाही, असा टोला त्यांनी लगावलाय.
लॉकडाऊनपासून मुंबईतील लोकल्स बंद आहेत. त्या लवकरात लवकर सुरू होण्याची मागणी सरदेसाईंनी केली आहे. यासाठी नियमावली बनवण्याचे त्यांनी सुचवले. मुंबईच्या मध्यवर्ती भागातून येणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लोकल सुरू झाल्यानंतर अनेकांच्या नोकऱ्या वाचतील. यासाठी नियमावली बनवून लोकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नितीन सरदेसाई यांनी केली. कामावर पोहचण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने अशांचा नोकऱ्या जाण्याची वेळ आली असल्याचं ते यावेळी म्हणाले.
तर कंगना रणौत किंवा सुशांत सिंह अशा पेक्षाही इतर अनेक गंभीर प्रश्न आहेत. कोवीड आणि मंदिच्या काळात अनेक गंभीर प्रश्न आहेत. सरकारने आणि इतरांनी याकडे लक्ष दिल्यास लोकांची सोय होईल, असे ते म्हणाले.