रत्नागिरी - खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांनी अखेर खेड न्यायालयात शरणागती पत्करली. रत्नागिरी कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. तत्कालीन प्रांताधिकारी प्रविण गेडाम यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची रवानगी रत्नागिरी कारागृहात करण्यात आली आहे. सोमवारी घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडीत आमदार संजय कदम यांच्यासह अन्य पाच जणांनी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात शरणागती पत्करली.
आमदार कदम यांनी झालेल्या शिक्षेविरोधात येथिल न्यायालयात वैयक्तिक बॉण्ड घेऊन उच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र असा बॉण्ड देण्याचा अधिकार अतिरिक्त सत्र न्यायालयाला नसल्याचे उच्च न्यायालयात समोर आले. कायदेशीर प्रक्रिया राबवताना झालेल्या या तांत्रिक चुकीमुळे आमदार संजय कदम यांच्यासह सुषमा कदम, विजय भिकाजी जाधव, हरिश्चंद्र लक्ष्मण कडू, नामदेव बाळाराम शेलार, प्रकाश गोपाळराव मोरे यांना अखेर खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात शरणागती पत्करावी लागली आहे.
2005 मध्ये अतिवृष्टी होऊन हाहाकार माजला होता. खेडमध्ये जगबुडी नदीचे पाणी घुसून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यावेळी संजय कदम शिवसेनेचे स्थानिक नेते होते. व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी याकरिता सेनेचा जमाव तहसील कार्यालयावर गेला यावेळी प्रांताधिकारी श्री. गेडाम उपस्थित होते. शिवसैनिक आणि गेडाम यांच्यात बाचाबाची सुरू असतानाच संजय कदम यांनी त्यांना धककबुक्की करत खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात श्री. गेडाम यांनी तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयात खटला सुरू होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन फेब्रुवारी 2015 मध्ये खेड दिवाणी न्यायालयाने राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना 1 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व दंड, अशी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर संजय कदम यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत 11 जुलै रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देताना खेड दिवाणी न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता.