रत्नागिरी - यंदाच्या गणेशोत्सव कोरोनाच्या संकट काळात होत आहे. या पार्श्वभूमीवर गावाकडे येणाऱ्या चाकारमान्यांना चांगले वागवणे आवश्यक आहे. त्याबाबत ग्रामपंचायतींनी सकारात्मक भूमिका ठेवावी तसेच कोरोनाचा फैलाव होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यांमधील सरपंचांच्या आज घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू जाकर, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडया साळवी, जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती बाबू म्हाप तसेच आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना विरुध्द आघाडीवर येऊन काम करणाऱ्या आरोग्य सेवक तसेच इतरांना शासनाने 50 लाखांचा विमा संरक्षण दिले आहे. यात जिल्हाधिकारी यांच्या शिफारशीसह संरपचांना देखील हे सरंक्षण असणार आहे, असे सामंत यावेळी म्हणाले. दरम्यान जिल्हयात 122 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नियुक्त करायचे आहेत. याबाबत न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर निर्णय होईल, असे सांगून ते म्हणाले की कोरोना रोखण्यासाठी गावात ग्रामकृती दल आहेत. या दलात सर्वांनी सहकार्यासाठी समाविष्ठ करण्याच्या सूचना दिल्या जातील.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गणोशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. याच प्रकारच्या सूचना गणेश स्थापना व विसर्जन तसेच गौरीच्या सणासाठी दिल्या जाणार आहेत. सर्वांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ग्रामीण भागात येणाऱ्या चाकरमान्यांना 10 दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय अंतिम आहे. यासाठी ग्रामपंचायतीला वेगळे निर्णय करता येणार नाहीत असे सामंत यांनी स्पष्ट केले. काही ग्रामपंचायतीनी 14 दिवसांचे ठराव घेतले त्याबाबत ते बोलत होते.
गावांमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन आरत्या करण्याची पध्दत यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करता येणार नाही. यामुळे कोरोना फैलावचा धोका आहे, असे त्यांनी यावेळी मार्गदर्शनात सांगितले.