रत्नागिरी - मला कोरोना झाल्यास मला सरकारी रुग्णालयातच दाखल करा, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी बोलताना म्हटले होते. याबाबत 'अशी' वेळ त्यांच्यावर येऊच नये. त्यांची प्रकृती उत्तम राहावी, अशीच आपण ईश्वराकडे प्रार्थना करत असल्याची प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. येथे आयोजित करण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोरोना झाल्यास गरीब रुग्णांना सरकारी रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र, राजकीय नेते, पुढारी मुंबईतील मोठ्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यावरून सरकारी रुग्णालयांतील उपचारांवर त्यांचा विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. 'गिरीश, मला जर कोविड झाला तर कोणत्याही खासगी रुग्णालयात दाखल करू नकोस. सेंट जॉर्ज किंवा इतर कोणत्याही सरकारी रुग्णालयातच उपचारासाठी दाखल कर आणि याचे तू मला वचन दे', अशी भावूक अपेक्षा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केली होती.
राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी राज्याचा दौरा केला होता. दौऱ्यानंतर आपल्याशी बोलताना फडणवीस यांनी या भावना व्यक्त केल्याची माहिती गिरीश महाजन यांनीच माध्यमांशी बोलताना दिली होती.
याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, 'ही त्यांची भावना आहे. मात्र, त्यांना कोरोना होऊच नये, हीच आपली सदिच्छा आहे. ईश्वराकडे माझे हेच सांगणे आहे'. तसेच मी जरतर वर विश्वास ठेवणारा नाही. देवेंद्र फडणवीसांनी ज्या भावना व्यक्त केल्या असतील किंवा पत्र लिहिले असेल तर त्याचा आम्ही आदर करतो. मात्र, तशी वेळ त्यांच्यावर येणारच नाही इतके चांगले आयुष्य त्यांना मिळाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यावेळी व्यक केली.