रत्नागिरी - मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. दीड वर्षात 10 टक्केही काम पूर्ण झालेले नाही. या दिरंगाईचा त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागत आहे. याची दखल घेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी सकाळी या कामाची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच एस.टी. महामंडळाच्या कार्यकारी अभियंता विदया भिलारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सामंत यांनी यावेळी राखडलेल्या कामाबाबत ठेकेदाराला चांगलंच धारेवर धरले. काम लवकर पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आवश्यक आहे. असे नियोजन करुन त्यावर कार्यवाही करा, असे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले. दरम्यान ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करण्याबाबत दिलेला शब्द न पाळल्यास कारवाई करणार असल्याचंही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
कामास विविध कारणांनी आजवर विलंब झाला आहे. यापुढील काळात तसे होणार नाही याची खबरदारी घ्या असे सामंत यावेळी म्हणाले. कामावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्याची सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली त्याला यावेळी मान्यता देण्यात आली. बस स्थानकाच्या कामामुळे नागरिक आणि प्रवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी स्थानकासमोर मुख्य मार्गावर उभे असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी लगेच दुसऱ्या ठिकाणावरुन बस सुटतील याची व्यवस्था करा त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्वरित देण्यात येतील असेही ते म्हणाले. एक ते दीड महिना कालावधीत बांधकाम प्रगतीपथावर आहे असे दिसले नाही तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला.
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा -
या कामाला गती देण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लगेच कार्यालयात बैठक घेतली व विविध विभागांना सूचना दिल्या. या बैठकीस कार्यकारी अभियंता विदया भिलारकर, तहसीलदार शशिकांत जाधव, नगर पालीका मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, आगार व्यवस्थापक अजय मोरे आदी उपस्थित होती.