रत्नागिरी - एखादी गोष्ट अधिकृत असेल तर त्याबाबत भाजपा नेते किरीट सोमैय्या यांना आक्षेप असण्याचे कारण काय? असा सवाल परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला आहे. अन्वय नाईक कुटुंबीय आणि रश्मी ठाकरे यांच्यात जागेबाबत तसेच आर्थिक व्यवहार आहेत. हे व्यवहार का लपवण्यात आले? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबीयांशी जमिनीचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना टार्गेट करत आहेत का? असे सवाल भाजपा नेते किरीट सोमैय्यांनी केले आहेत. यानंतर अनिल परब यांनी किरीट सोमैय्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
हा उघड व्यवहार आहे -
याबाबत शिवसेना नेते, परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले, 'मी कुणाची जमीन घेतली असेल, तर मी त्याला फसवले का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबीयांकडून जमीन घेतली आहे. त्या जमिनीचा व्यवहार लपवलेला नाही. हा व्यवहार उघड आहे. ज्या व्यवहारावर शिक्कामोर्तब झालेला आहे. हा खूप वर्षांपूर्वीचा व्यवहार आहे. मात्र, ओढून-ताणून संबध दाखवून लोकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करण्याचे काम भाजपाचे हे 'पोपट' करत असल्याची टीका परब यांनी केली.
हेही वाचा - अर्णव गोस्वामींना मारहाण करू नका; किरीट सोमय्यांची जेलरला विनंती
सोमैयांच्या आरोपात तथ्य नाही -
किरीट सोमैयांनी केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. या विषयात काही गंभीर बाब नाही. तसेच या व्यवहारात आम्ही कुठली चोरी केलेली नाही, या व्यवहाराची नोंद निवडणूक आयोग आणि प्राप्तीकर विभागाकडे आहे. त्यामुळे हा व्यवहार उघड असल्याचा दावा अनिल परब यांनी केला आहे.
नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सध्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हे न्यायालयीन कोठडीत असताना आता ठाकरे कुटुंबाचा अन्वय नाईकशी संबंध असल्याचा आरोप सोमैया यांच्याकडून करण्यात आला आहे. याप्रकरणावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अन्वय नाईक कुटुंबीयांचे व रश्मी ठाकरे यांचे जागेबाबत तसेच आर्थिक व्यवहार होते, ते का लपवले गेले? उद्धव ठाकरे व मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबीयांकडून जमिनी घेतल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे अर्णब गोस्वामी यांना टार्गेट करत आहेत का? असे प्रश्न सोमैय्या यांनी विचारले आहेत.