रत्नागिरी - काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री यांच्याकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र मी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिल्याचं विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं होते. यावर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्री चव्हाण यांचे विधान खोडून काढले आहे.
याबाबत बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निधी देताना कुठलीच काटकसर करत नाहीत, महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यासहित त्यांच्या खात्यासहित त्यांच्या मतदार संघापर्यत निधी दिला जातो. तिन्ही नेत्यांच्या लोकप्रतिनिधींचा सन्मान मुख्यमंत्री करत असल्याचे सत्तार यांनी सष्ट केलं. कुठे तरी एका दुक्का चुकला असेल, पण हे पहिले असे सरकार आहे, की जिथं मंत्र्यांना इतके अधिकार देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री इतक्या पारदर्शक पद्धतीने काम करत असल्याचे सांगत सत्तार यांनी अशोक चव्हाण यांचे विधान खोडून काढले आहे.
गिरीष महाजन यांनाच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं वाटत असावं -
'महाविकास आघाडीतील नेत्यांना मराठा आरक्षण मिळू नये असं वाटतं', या गिरीष महाजन यांच्या विधानाचा समाचार महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आहे. गिरीष महाजन यांनाच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं वाटत असावं, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे. महाविकास आघाडीतल्या सर्वच नेत्यांना आरक्षण मिळावं असं वाटतं, मात्र ज्यांना वाटतंय आरक्षण मिळू तेच दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवतायत असा उपरोधीक टोला सत्तार यांनी महाजनांना लगावला आहे.