रत्नागिरी - जिल्ह्यात तरुणाईला मुख्य प्रश्न भेडसावतो तो बेरोजगारीचा. दहावी, बारावी किंवा पदवीधर झाल्यानंतर येथील तरुणाला कामासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागते. अनेकजण मुंबई, पुणे गाठतात. त्यामुळे जिल्ह्यातच अधिकाधिक रोजगार निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे तरुणाईला वाटत आहे. तसंच चांगले उच्च शिक्षण जिल्ह्यात कसे मिळेल, यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे तरुणांना वाटत आहे.
हेही वाचा - रत्नागिरीत पाचही जागांसाठी शिवसेनेकडून उमेदवारांना 'एबी फॉर्म'
रत्नागिरी जिल्ह्यात 2009 पूर्वी 7 विधानसभा मतदारसंघ होते. मात्र, 2009 साली झालेल्या मतदारसंघ पुनर्ररचनेत दोन मतदारसंघ कमी झाले. याचे मुख्य कारण म्हणजे येथील घटलेली लोकसंख्या. आज कोकणातल्या ग्रामीण भागात बहुतांश घरे बंद अवस्थेत आहेत, तर काही घरांमध्ये फक्त वयोवृद्ध पहायला मिळतात. कारण रोजगारासाठी गाव सोडून बरेच जण पुण्या-मुंबईत वा अन्य ठिकाणी गेले आहेत. जिल्ह्यातील तरुण वर्ग सुद्धा याच मार्गावर आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर चांगले उद्योग जिल्ह्यात आले पाहिजेत. एखाद्या प्रकल्पाला विरोध करताना तरुणाईच्या काय भावना आहेत हेही समजून घ्यायला हवे, असे तरुणांना वाटत आहे. उच्च शिक्षणाच्या संधी जिल्ह्यातच निर्माण व्हायला पाहिजेत, वैद्यकीय महाविद्यालय, आयटी हब जिल्ह्यात होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे तरुणाईला वाटत आहे.
हेही वाचा - शिवसेनेचे सहदेव बेटकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, तटकरेंची घेतली भेट