रत्नागिरी - कोरोनाने देशभर थैमान घातले आहे. त्यामुळे, लॉकडाऊन पुन्हा एकदा 17 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत. अनेकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. अशात कोळंबी मत्स्य शेतीचेही नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यातील अणसुरे गावचे प्रवीण गावकर यांच्या कोळंबी मत्स्य शेतीलाही याचा मोठा फटका बसला आहे.
लाखो रुपये खर्चून त्यांनी हा प्रकल्प उभा केला. आता कोळंबी तयारही झाली, मात्र विक्रीच नसल्याने पाच टन कोळंबी मत्स्य शेतीत तशीच पडून आहे. नोकरी नाही, त्यामुळे गावातच काहीतरी करावे. जेणेकरून आपल्याबरोबर इतरांनाही रोजगार मिळेल या हेतूने प्रवीण गावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजापूरमध्ये कोळंबी शेतीचा प्रकल्प केला. त्यामुळे, स्थानिक गावकऱ्यांना रोजगारही मिळाला. कोळंबी शेतीत 3 लाख बीज टाकण्यात आले. हा संपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी त्यांना जवळपास 30 ते 40 लाख खर्च आल्याचे प्रवीण गावकर सांगतात.
हा प्रकल्प उभारण्यासाठी कोणतेही शासकीय अनुदान घेण्यात आले नसल्याचेही गावकर यांनी सांगितले. आता चार महिन्यानंतर पहिल्या टप्प्यातील कोळंबी तयारही झाली. जवळपास 5 टन कोळंबी तयार झाली असून या सर्व कोळंबीची किंमत जवळपास 20 लाख रुपये आहे. या कोळंबीसाठी लागणारे खाद्य 88 ते 90 रुपये किलो आहे आणि दर दिवशी साधारणतः 70 ते 80 किलो खाद्य लागते. त्याशिवाय दररोज लागणारी वीज, मजुरांचा खर्चही आहेच. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे या तयार कोळंबीला उठाव नाही.

स्थानिक पातळीवर थोडीफार कोळंबी विकली जाते. मात्र, त्याला दरही नाही. 450 रुपये मिळणारा दर आता फक्त 200 ते 250 रुपये मिळत आहे. त्यामुळे, एवढी तयार कोळंबी करायची काय? त्यात केलेला खर्चही निघण्याची शक्यता नाही. त्यामुळे, प्रवीण गावकर अडचणीत आले असून त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. अशात शासनाने आमच्याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी गावकर यांनी केली आहे.