रत्नागिरी - रिफायनरी संदर्भातील वातावरण जिल्ह्यात पुन्हा एकदा तापले आहे. दरम्यान, हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा यासाठीही जोरदार प्रयत्न सुरू ( Rajapur Refinery Project ) आहेत. सरकारही सकारात्मक असल्याचे गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या वतीने एक हजार बेरोजगार युवक-युवतींची पहिली यादी रत्नागिरी ग्रीन रिफायनरी कंपनीकडे सुपुर्द करण्यात आली आहे. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार असून, जसजसे विविध तालुक्यांतून बेरोजगार युवक-युवतींच्या नावांचे शैक्षणिक पात्रतेसह महासंघ संकलन करेल. तसे याद्या कंपनीकडे देण्यात येतील, असे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, महिला अध्यक्षा सुष्मिता तोडणकर, उपाध्यक्ष प्रविण आचरेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, महासंघाचे रिफायनरी समन्वयक पंढरीनाथ आंबेरकर, दादर भंडारी मंडळाचे उपाध्यक्ष यश केरकर, सचिव विनोद चव्हाण आरआरपीसीएल कंपनी सेक्रेटरी राजू रंगनाथन आदी उपस्थित होते .
या प्रकल्पात लाखो लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भंडारी समाजातील युवक-युवतींना नोकरी व्यवसायाच्या प्रशिक्षणात अग्रक्रम द्यावा. प्रकल्पांतर्गत निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी महासंघातर्फे मागणी करण्यात आली आहे. अखिल भारतीय भंडारी महासंघाने अशा औद्योगिक प्रकल्पांचे कोकणात समर्थन करण्याचे ठरवले असून, त्यांच्यातर्फे हे कार्य यापुढे निरंतर सुरु राहणार आहे. तसेच, प्रकल्पांतर्गत नोकरी अथवा व्यवसाय करण्यास इच्छुक उमेदवारांची माहिती गोळा करून कंपनीकडे सादर करण्याचा उपक्रम यापुढे मोठ्या जोमाने हाती घेतला जाईल, असे बांदिवडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Ajit pawar : मोबाईल रिचार्ज प्रमाणे विजेसाठी प्रिपेड कार्ड आणण्याचा राज्य सरकारचा विचार - अजित पवार