रत्नागिरी - ५ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेसह २५ हजार रु. दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ११ जून २०१८ ला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती.
पिडीत चिमुरडी दि.११ जून २०१८ रोजी सायंकाळी लहान मुलांसोबत घराशेजारी खेळत होती. आजीची तब्येत बिघडल्याने, घरातील सर्वजण त्यांना घेऊन रूग्णालयात गेले होते. या संधीचा फायदा घेत, बाजूच्या खोलीत राहणारा ट्रकचालक मंजुनाथ लिंगाप्पा हसमणी (वय २९, रा.उद्यमनगर, मुळ कर्नाटक) याने चिमुरडीला चहा, बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून आपल्या खोलीत नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर चिमुरडी आपल्या खोलीजवळ रडत होती.
आजीसह आई-वडील घरी आल्यानंतर त्यांनी चिमुरडीची चौकशी केली. घाबरलेल्या चिमुरडीला सुरूवातीला काहीच सांगता आले नाही. काही वेळ गेल्यानंतर घडलेला प्रसंग तिने कुटुंबीयांना सांगितला. याबाबत चिमुरडीच्या आईने ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी येऊन मंजुनाथ हसमनी याला ताब्यात घेतले. सोमवारी खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने आरोपी मंजुनाथ लिंगाप्पा हसमणी याला जन्मठेपेसह २५ हजार रु. दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
फियार्दीवरून पोलीसांनी मंजुनाथ हसमनी याच्याविरूध्द भा.द.वि.कलम ३७६, बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक चित्रा मडवी यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पुर्ण करुन श्रीमती मडवी यांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. तर पोलीस निरिक्षक सुरेश कदम, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी तपासासाठी मार्गर्शन केले होते.