रत्नागिरी - शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीने एका बिबट्याचा बळी घेतला आहे. फासकी तोडून पळालेला हा बिबट्या अखेर मृतावस्थेत सापडला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावातील कालभैरव मंदिराजवळ हा मृत बिबट्या आज (शनिवार) सकाळी आढळून आला.
हेही वाचा - LIVE : संजय राऊत यांना कर्नाटक पोलिसांनी घेतले ताब्यात, निपाणीमार्गे महाराष्ट्रात सोडणार
कसबा येथील कालभैरव मंदिराशेजारील अलकनंदा नदीवर काही महिला नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी काही महिलांना कातळाच्या घबीमध्ये बिबट्या दिसून आला. त्यामुळे महिलांमध्ये एकच घबराट पसरली. मात्र, बिबट्या काहीच हालचाल करत नसल्याचे लक्षात येताच काहींनी जवळ जाऊन पाहिले. त्यावेळी तो बिबट्या मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले. या बिबट्याच्या कमरेजवळ एखाद्या हत्याराने कापावा अशा पद्धतीने फास बसला होता. त्यामुळे बिबट्याची आतडी बाहेर आली होती. ही बातमी पंचक्रोशीत पसरली. ग्रामस्थांनी या बिबट्याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याला ताब्यात घेतले.
हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे 2 वर्ष आहे. कमरेभोवती फास जास्त आवळल्यामुळे त्याचा तेथील भाग कट होऊन मृत्यू झाला. पहाटे या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. या बिबट्याच्या मृत्यूचा अधिक तपास वनविभाग करत आहे.