रत्नागिरी - घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना घराच्या वाशात अडकलेल्या बिबट्याच्या पिल्लाची वन विभागाने सुखरूप सुटका केली. राजापूर तालुक्यातील शेजवली गावात सोमवारी ही घटना घडली. या पिलाला पिंजऱ्यात जेरबंद करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
राजापूर तालुक्यातील शेजवली गावात सुभाष राणे यांचे कौलारू घर आहे. या घराचा वासा आणि कौलाच्या चिंचोळ्या जागेतून या बिबट्याने घरात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची मान कौलात अडकली. वेदना होऊ लागल्याने तो जोरात ओरडू लागला. ही गोष्ट राणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाला याची कल्पना दिली.
हेही वाचा - ठाण्यातील सापर्डे गावात भातशेतातील खळ्यावर ३ विषारी घोणस साप; सर्पमित्रांकडून जीवदान
ही माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या बिबट्याच्या पिल्लाला पकडून पिंजऱ्यात कैद केले. या पिल्लाचे वय अंदाजे सहा ते सात महिने असून ते नर जातीचे आहे. वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.