रत्नागिरी - बिबट्याचा मानवी वस्तीमधील वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घराच्या पडवीतून रात्री दहा वाजता बिबट्याने पाळलेल्या श्वानावर हल्ला करून पळवून नेले, बिबट्याचा हा पराक्रम सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक गावात बुधवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे.
श्रीकृष्ण सरदेसाई यांच्या घरातील पाळीव श्वान (कुत्रा) बुधवारी रात्री अचानक गायब झाला. गायब झालेल्या श्वानाचा शोध घेताना सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यावेळी धक्कादायक वास्तव समोर आले. यात बिबट्याने घराच्या पडवीतून हळुवार येवून श्वानावर झडप घातल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेमुळे वनखाते सतर्क झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी आता वनखात्याकडून पिंजरा लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच ग्रामस्थांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गेल्याच महिन्यात वेरवली बुद्रुक गावात एक बिबट्या मरून पडला होता. बुधवारी पुन्हा दुसऱ्या बिबट्याने मानवी वस्तीत येऊन एका श्वानाला पळवून नेल्याने गावात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - ई टीव्ही विशेष : निवृत्त शिक्षिका तेजा मुळ्ये करतायेत कोविड रुग्णांचे समुपदेशन
हेही वाचा - रत्नागिरीत बिबट्याचा लागोपाठ तीन दुचाकीस्वारांवर हल्ला