रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडे कोकण आयुक्तांनी मदतीसाठी भरीव अशी रकमेची मागणी केली होती. दरम्यान, आयुक्तांच्या या मागणीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, कोकणला 360 कोटींची मदत मिळणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. पैकी 130 कोटींची रक्कम ही रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार आहे. ही रक्कम उद्या संध्याकाळपर्यंत जिल्ह्याच्या ताब्यात देण्यात येईल किंवा वर्ग केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली.
दरम्यान, केंद्रीय पथकाच्या प्रमुखांच्या वागण्यावर उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रीय पथकाच्या इतर सदस्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले. पण, त्यांचे चेअरमन मात्र अत्यंत बिझी होते. दापोलीत त्यांना नेटवर्क मिळत नसल्याने ते कावरेबावरे झाले होते. शिवाय, डोक्यावर गरम पाणी मिळालं नाही, तर डोकं थंड होणार नाही असं सांगत त्यांनी तडक महाड गाठल्यांचे सांगत सामंत यांनी त्यांच्या वागण्यावर एक प्रकारे नाराजी व्यक्त केली. पण, पथकाच्या इतर सदस्यांकडून चांगलं सहकार्य झाल्याचे त्यांनी सांगितले.