रत्नागिरी - गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वेने जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. बहुतांश रेल्वे उशीराने धावत असल्याने प्रवासी आणि चाकरमान्यांचो मोठे हाल होत आहेत. एक्सप्रेस गाड्या दोन ते साडेतीन तास उशीरा धावत आहेत यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांतच ताटकळत बसावे लागत आहे.
यामध्ये, मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस (गाडी क्र. १०१११) तब्बल अडिच तास उशिरा धावत आहे. दादर ते सावंतवाडी दरम्यान धावणारी तुतारी एक्स्प्रेस (गाडी क्र. ११००३) एक तास २३ मिनिटे उशिरा, पनवेल-सावंतवाडी तब्बल साडेतीन तास उशिरा, पनवेल-थिविम गणपती विशेष गाडी दोन तास उशिरा, दुरंतो एक्स्प्रेस दोन तास, कुर्ला-सावंतवाडी गणपती विशेष गाडी दोन तास उशिराने धावत आहेत. यामुळे पॅसेंजर गाड्यांपेक्षा जादा पैसे देऊन एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून रेल्वे प्रशासनाबाबत नाराजीचा सूर येत आहे.