रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे. चिपळूण तालुक्यातील सर्वात मोठी असलेली ही ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहे. मात्र जुने सहकारी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे लागले आहे.
आमच्या उमेदवारांना जनतेकडून चांगला प्रतिसाद - यादव
खेर्डी हे गाव शहरालगत असल्याने या गावाचेही शहरीकरण झपाट्याने होत आहे. मात्र आजही इथे अनेक प्रश्न आहेत. याबाबत बोलताना चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व खेर्डीतील सुखाई परिवर्तन पॅनलचे प्रमुख प्रशांत यादव म्हणाले की, 'आमच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद लक्षात घेता आमचे सर्व उमेदवार निवडणुकीत विजयी होतील.'
रखडलेली पाणी योजना मार्गी लावणार
रखडलेली पाणी योजना मार्गी लावणे हे आमचं प्रमुख ध्येय आहे. त्याचबरोबर सुसज्ज क्रीडांगण, अद्ययावत बगीचा, सांस्कृतिक केंद्र आदी विकासात्मक योजना राबविण्याचा आमचा संकल्प असल्याचे यादव यावेळी म्हणाले.
खेर्डी ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीबाबत बोलताना प्रशांत यादव म्हणाले की, 'पाणी योजनेच्या बाबतीत दुर्दैव वाटते. गावाच्या हितासाठी एकमेकांना समजून घेत काहींनी सामाजिक बांधिलकी जपली असती, तर खेर्डीची १४ कोटींची योजना झाली असती. ही योजना कार्यान्वित झाली पाहिजे.'
खेर्डी औद्योगिक वसाहतीत कामासाठी येणाऱ्या कुशल-अकुशल कामगारांची यादी व संपूर्ण माहिती कंपनी व्यवस्थापनाने आमच्याकडे देण्याची गरज आहे. तरच पुढील काही प्रश्नांवर मात करणे शक्य होणार असल्याची भूमिका यादव यांनी परप्रांतीयांबाबत मांडली. दरम्यान खेर्डी औद्योगिक वसाहतीतील रिकाम्या असलेल्या भूखंडाच्या ठिकाणी सुसज्ज क्रीडांगण व अद्ययावत बगीचा व सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - रत्नागिरी : दापोलीत 'त्या' कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच
हेही वाचा - ... तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही-उदय सामंतांचा इशारा