रत्नागिरी - एकात्मिक बालविकास योजनेच्या अंतर्गत अंगणवाडीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या धान्याच्या बाबतीतला धक्कादायक प्रकार चिपळूण तालुक्यामधील खडपोली येथील ग्रामस्थांनी उघडकीस आणला आहे. सडलेले धान्य आणि डाळी पॅकिंगसाठी सुकवत असताना खडपोलीच्या ग्रामस्थांनी अचानक कंपनीत धाड टाकली आणि हा सगळा प्रकार समोर आला. त्यानंतर आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद अद्यक्ष रोहन बने यांच्यासह राजकीय नेत्यांनी पाहणी केली. त्याचबरोबर अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी करुन हे गोडाऊन सील केले.
बुरशी पडलेले धान्य व्यवस्थित सुकावे म्हणून सर्वत्र पसरवून त्यांना फॅन आणि हाय व्होल्टेजच्या हॅलोजनखाली सुकविण्यासाठी ठेवण्यात आले होते. मात्र, संबंधित कंपनीने आपण हे टाकण्यासाठीच सुकवत असल्याचा निर्वाळा देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारची गंभीर दखल घेत स्थानिक आमदार शेखर निकम आणि जि. पचे अध्यक्ष रोहन बने यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.