रत्नागिरी: मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोदवली येथील पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगात येणार्या महेंद्रा थार गाडीचा आणि पत्रकार शशिकांत शंकर वारीशे यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये वारीशे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र, आज सकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत शशिकांत वारीशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले (रा. तेलीआळी, रत्नागिरी) यांनी राजापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार थार चालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर (रा. राजापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीला पोलीस कोठडी : आज आरोपीला राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता राजापूर न्यायालयाने त्याला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, या अपघाताबाबत पोलिसांनी प्राथमिक तपास केला. त्या माहितीनुसार सुरुवातीला पोलिसांनी सदोष मनुष्यवधास कारणीभूत ठरू शकेल अशा प्रकारे घटनेची नोंद घेतली. त्यानंतर भादंवी कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपीला राजापूर न्यायालयात हजर केले असता, 7 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणाबाबत पोलीस सर्व बाबी तपासत आहेत. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची माहिती घेतली जात असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
एसटी बसचा अपघात: रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना दापोली तालुक्यात 25 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. यामध्ये 2 एसटी बसचा समोरासमोर धडकून अपघात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले होते. यामध्ये एक बस चालक गंभीर जखमी झाला. सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.
बसचे स्टेरिंग लॉक: या जखमींमध्ये विद्यार्थी आणि महिलांचा समावेश आहे. बोरिवली माटवण बस दापोलीकडे येत असताना मंडणगड मार्गावर मौजे खेर्डीजवळ ही बस आणि दापोली मुरादपूर या दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. सकाळी ८.३० च्या सुमारास हा अपघात झाला होता. दोन्ही बस समोरासमोर धडकल्यामुळे बसचे स्टेरिंग लॉक होऊन बोरीवली माटवण बसमधील ड्रायव्हर गंभीर जखमी झाला होता. सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.
हेही वाचा : Food Poisoning: श्राद्धाचं जेवण पडलं महागात, फुकटचं खाऊन गावंच पडलं आजारी, आता सगळ्यांना केलं भरती