रत्नागिरी : सोमवारी थार गाडी आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात शशिकांत वारीसे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी अटक केली. त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. शशिकांत वारीसे यांचे राजापूर तालुक्यातील कशेळी हे गाव आहे. वारीसे यांच्या कुटुंबांमध्ये एकूण 3 माणसे, त्यांचा मुलगा यश, त्यांची आई शेवंती शंकर वारीसे आणि शशिकांत वारीसे असे तिघेजण कुटुंबातील सदस्य आहेत. वारीसे यांचा मुलगा यश आयटीआयचे शिक्षण घेत आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी शशिकांत वारीसे यांच्यावरच होती.
कुटुंबीयांची हळहळ: शशिकांत वारीसे यांच्यावरच त्यांच्या कुटुंबाचा डोलारा होता. त्यांच्या अपघाती मृत्यूबाबत बोलताना त्यांचा मुलगा यशने सांगितले की, बाबांना माझी काळजी होती. आयटीआयला पोहचल्यावर मला नेहमी फोन करायला सांगायचे. माझ्यावर त्यांचा खूप जीव होता. त्यामुळे ज्याने कोणी हे कृत्य केले आहे, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असा आक्रोश यशने केला. शशिकांत वारीसे यांच्या आईचा आक्रोश देखील मन हेलावून टाकणारा होता. या अपघाताबाबत ज्यांनी तक्रार दिली आहे, ते शशिकांत वारीसे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले यांनी सांगितले की, माझ्या मेहुण्याचा हा अपघात नसून त्याला मारलेलेच आहे. या रिफायनरीच्या प्रकरणात त्याचा जीवच घेतलेला आहे. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे यावेळी नागले यांनी सांगितले. तर वारीसे यांची बहीण अरुणा अरविंद नागले आणि चुलत भाऊ स्वप्नील मोहन वारीसे यांनी देखील हे कृत्य करणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे सांगितले.
कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल: पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. पंढरीनाथ आंबेरकर यांना दिलेल्या जबाबावरून हे कलम लावण्याच आल्याचे कुलकर्णी म्हणाले. तसेच कलम लावण्याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यार असल्याचे म्हटले आहे.
वारीशे दुचाकीला अपघात: राजापूर कोदवली येथील पेट्रोलपंपाजवळ सोमवारी दुपारी थार गाडी आणि वारीशे यांच्या दुचाकीमध्ये अपघात झाला होता. त्यामध्ये पत्रकार शशिकांत वारीशे गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले होते.
हेही वाचा : Embryos found In Surat : ही कसली आई? रस्त्यावर भ्रूण सोडून पळाली महिला