रत्नागिरी - येथील चिपळूण-गुहागर मार्गावरील गोवळकोट परिसरात गुरांची अवैध वाहतूक केल्याची घटना घडली आहे. गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. यावेळी त्या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे ग्रामस्थांनी दोघांना चांगलाच चोप दिला.
नियमित गुरांची वाहतूक करत असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी एका गाडीवर पाळत ठेवली होती. अखेर आज स्थानिक ग्रामस्थांनी ही गाडी थांबवली. त्यांनतर गाडीची तपासणी करण्यात आली. तपासणीत गाडीत गुरे असल्याचे निष्पन्न झाले. ग्रामस्थांनी त्या गाडीच्या चालक आणि क्लीनर विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी या दोघांनाही चांगलाच चोप दिला.
या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी चिपळूण पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, ग्रामस्थांनी वाहनासह एकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर वाहन चालक मात्र फरार झाला आहे. यापूर्वी चिपळूण-लोटे येथे २६ जानेवारीला असाच प्रकार घडल्याने मोठी जाळपोळ केली आणि स्थानिक ग्रामस्थांनी महामार्ग रोखला होता.