मुंबई : काही दिवसातच राज्यात विधानसभा निवडणूक 2024 चा बिगुल वाजणार आहे. त्या अनुषंगानं महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते राज्यभर सभा आणि मेळावे घेत आहेत. मात्र, यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये 'लाडकी बहीण योजने'वरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचंही बघायला मिळतंय. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधलाय. " लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता द्यायची सरकारकडं ताकद नाही. सरकार कर्जावर सुरू आहे," असा गंभीर आरोपही राऊतांनी केलाय.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? : यासंदर्भात मुंबईत माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले , "सरकारी कर्मचाऱ्यांच्यावतीनं पगाराची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सरकारकडं तर लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता देण्याची सुद्धा ताकद नाही. सरकार सध्या कर्ज घेऊन सर्व काही घोषणा करतंय. देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यानंतर लाखो कोटींच्या योजनांची घोषणा केली. मात्र, त्यासाठी पैसा आणणार कुठून? सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. सरकारी कर्मचारी, पोलीस, शिक्षक यांचेदेखील पगार होणार नाहीत", असा दावाही संजय राऊतांनी केला.
राज्यातील सर्व ठेकेदार कंगाल : पुढं ते म्हणाले, "हा खेळ थोड्या दिवसांचाच असून हे सरकार लवकरच कोसळणार आहे. ठेकेदारांकडून सरकारनं 40 टक्के कमिशन अॅडव्हान्स घेतलंय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी 40%, त्यांच्या मुलानं 20% त्यानंतर इतरांनी दहा टक्के घेतले. त्यामुळं ठेकेदारांकडून अगोदरच 60 टक्के कमिशन वसूल केलं जातंय. त्यामुळं राज्यातील सर्व ठेकेदार कंगाल झाले असून भिकेला लागलेत." तसंच लाडकी बहीण योजनेच्या खेळामुळं महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी, पोलिसांचा पगार होणार नाही. अशी परिस्थिती दिसत आहे. उर्वरित महाराष्ट्राची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे, असेही संजय राऊतांनी म्हटलंय.
दिल्लीत मुजरा करण्यासाठी जावं लागतं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांचे आका, मालिक, बॉस दिल्लीत असून त्यांना मुजरा करायला जावं लागतं. एकेकाळी दिल्लीत ब्रिटिशांची सत्ता होती. तेव्हा जावं लागत होतं. त्या अगोदर मुघलांची सत्ता होती. तेव्हा औरंगजेब, अकबर इथून जात होते. हे सगळे त्यांचेच वंशज आहेत."
हेही वाचा -
- लाडक्या बहिणीचे अर्ज दाखल करण्याला पुन्हा मुदतवाढ? 'हा' नवीन नियम नक्की वाचा - Mazi Ladki Bahin Yojana
- बापरे! लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेणार? नेमकं प्रकरण काय? - Ladki Bahin Yojana
- लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात सरकारची कठोर पावलं; अदिती तटकरे म्हणाल्या, "सावत्र भावावर कारवाई..." - Missused of Ladki Bahin Yojana