मुंबई : देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची तब्येत उत्तम आहे. सोमवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती बिघडल्याचा दावा काही रिपोर्टमधून करण्यात आला. मात्र, प्रकृती उत्तम असल्याची माहिती रतन टाटा यांच्या एक्स मीडियाच्या हँडलवरून देण्यात आली आहे.
नियमित तपासणीसाठी रूग्णालयात दाखल : "माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अफवांची मला जाणीव आहे. पण ते सर्व दावे निराधार आहेत. याची मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो. वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे वैद्यकीय तपासणी करत आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. माझी प्रकृती सध्या ठणठणीत आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये", असं रतन टाटा एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
Thank you for thinking of me 🤍 pic.twitter.com/MICi6zVH99
— Ratan N. Tata (@RNTata2000) October 7, 2024
टाटा समुहानं घेतली यशाची भरारी- रतन टाटा हे देशातील सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. त्यांनी 1991 ते 2012 पर्यंत टाटा समुहाचे नेतृत्व केले. टाटा समुहाचा वाहन उद्योग जगभरात विस्तार करण्यात त्यांना प्रचंड यश मिळाले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहानं अनेक नवीन उत्पादनं विकसित केली. रतन टाटा हे विविध उद्योग आणि कंपन्यांमध्येदेखील गुंतवणूक करतात. त्यांनी गुंतवणूक करून मदतीचा हात दिल्यानं अनेक स्टार्टअप कंपन्यांनी यशाची भरारी घेतली. कोरोनाच्या काळात रतन टाटांच्या सूचनेनंतर टाटा ट्र्स्टकडून मोठ्या प्रमाणात सरकारला रुग्णांवर उपचार करण्याकरिता मदत करण्यात आली.
आदर्श उद्योगपती अशी ओळख- टाटा ट्रस्टकडून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणाचे संरक्षण अशा विविध विषयांवर काम करण्यात येते. रतन टाटा यांचे कार्य फक्त व्यावसायिक यशावरच नाही तर समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या उद्यमशीलतेसह, त्यांनी समाजसेवेच्या अनेक उपक्रमांमध्ये योगदान दिलं आहे. त्यामुळे त्यांना एक आदर्श उद्योगपती मानले जाते.
हेही वाचा -