रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. नाणार गेलेच, मात्र रिफायनरी प्रकल्प इतरत्र लोकांना हवा असेल तर त्याचा विचार सरकार नक्की करेल. बारसु भागातील ग्रामपंचायतींनी रिफायनरी प्रकल्पाची मागणी केली, याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तसेच कंपनीशीही याबाबत चर्चा करणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी म्हटले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील हवा प्रदूषण निरीक्षण यंत्रणेचे शनिवारी (दि. 16) उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, उद्योगपती डॉ. सतीश वाघ आदी उपस्थित होते.
बारसु ग्रामस्थांशी करणार चर्चा
गेले काही दिवस बारसु भागात रिफायनरीला समर्थन वाढत आहे. काही ग्रामपंचायतिनीही समर्थनाचे ठराव केले आहेत. याबाबत देसाई म्हणाले, स्थानिक जनतेचा विरोध म्हणून प्रकल्प नको, पण स्थानिक जनतेची मागणी म्हणून प्रकल्प हवा, अशी जर सकारात्मकता असेल, तर नक्कीच त्याचा विचार केला जाईल. बारसु भागातील ग्रामपंचायतींनी हा प्रकल्प हवा अशी मागणी आहे, याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत.
प्रकल्पाबाबत सकारात्मकता
बारसुला एमआयडीसीने अधिसूचना काढून काही जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. जर या ठिकाणी प्रकल्प येण्याचा निर्णय झाला, तर त्या अधिसूचनेचा वापर होऊन त्या भूसंपादनाचा फायदा होऊ शकतो, असे देसाई यांनी म्हटले आहे. तसेच स्थानिक जनतेची मागणी असेल, सगळ्यांचा पाठींबा असेल तर हा प्रकल्प होऊ शकतो, असे म्हणत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.
हेही वाचा - आमदार भास्कर जाधव यांचे पारंपारिक 'जाखडी नृत्य', पाहा व्हिडिओ...