रत्नागिरी - विहिरीत पडलेल्या गवा रेड्याला अखेर सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलं आहे. रत्नागिरीतल्या भोके इथल्या ब्राम्हणवाडीतील सुभाष जयराम कुलकर्णी यांच्या घरासमोरील विहिरीत हा गवा रेडा पडला होता. ही विहीर सुमारे १५ ते २० फुट खोल आहे. पहाटेच्या सुमारास हा गवा या विहिरीत पडल्याची शक्यता आहे.
गवा रेडा विहिरीत पडल्याचे सकाळी निदर्शनास आल्यानंतर या त्याला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. दरम्यान माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि या गवा रेड्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.
हेही वाचा - '...मग मुंबई-गोवा महामार्गावरील एमइपीची आम्ही पूजा करायची का?'
या गवा रेड्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाने अनोखी शक्कल वापरली. त्यांनी जेसीबीने विहिर खोदून गवा रेड्याला बाहेर पडण्याचा रस्ता बनवून दिला. मार्ग बनवताच गवा रेडा विहिरीतून बाहेर पडला आणि त्याने जंगलात धूम ठोकली. या गवा रेड्याच्या सुटकेचा थरार अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला.
हेही वाचा - ओले काजूगर खाताहेत 'भाव', एका किलोला २५०० चा दर