रत्नागिरी - रत्नागिरीकरांना यापुढे घराच्या अगदी जवळ बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत. नुकतंच रत्नागिरीत फिनो पेमेंट्स बँकेच्या 4 शाखांचा लोकार्पण सोहळा पार पडला. ज्यांच्या घराच्या जवळपास कुठलेही एटीएम अथवा बँका नाही अशा नागरिकांना फिनो पेमेंट्स बँकेचा फयदा होणार आहे. त्यांना घराच्या अगदी काही अंतरावर बँकिंग सुविधा मिळणार आहेत. रत्नागिरीतील बंदर रोडवरील अभिनव कम्युनिकेशन, पावस रोडवरील साळवी इंटरप्रायजेस, मार्लेश्वर फाट्याजवळील गिरीजापती इंटरप्रायजेस, मंडनगड-वेस्वे येथील पानसरे पेमेंट्स सर्विसेस ही बँकिंग आऊटलेट्स रत्नागिरीतील शेकडो ग्राहकांसाठी बँकिंग सुविधा देणारे महत्त्वाची ठिकाणे बनली आहेत.
रत्नागिरीत इतर बँकेच्या शाखा कमी आहेत, तसेच एटीएमची संख्या देखील कमी आहे. उपलब्ध असलेल्या एटीएममध्ये कायम पैशांचा तुटवडा असतो. त्यामुळे नागरिकांना बँकिंग सुविधेसाठी मोठी कसरत करावी लागते. त्यातच कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे घराबाहेर पडणे अशक्य होत असल्याने नागरिकांचे हाल होत होते.मात्र आता रत्नागिरीत फिनो पेमेंट्सच्या शाखा उघडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशा बँकिंग आऊटलेटमधील मायक्रो एटीएम उपकरणाद्वारे ग्राहकांना बँकेचे व्यवहार करणे सुलभ होत आहे. नवीन खाते उघडणे, बिले भरणे, विमा काढणे अशा विविध सुविधा ग्राहकांना मिळाल्या आहेत. रत्नगिरीत सुमारे शंभर छोटे बँकिंग पॉईंट्सचे जाळे पसरलेले आहे. या मायक्रो एटीएममार्फत बँक ग्राहकांच्या, विशेषत: ग्रामीण जनतेच्या जवळ आली आहे. या बँकेचे जाळे राज्यातील सर्व 36 जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे.