रत्नागिरी : राज्यात भोंग्याचा विषय़ गाजत असताना रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांनी महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. रत्नागिरी शहरात सकाळच्या अजानवेळी भोंग्याचा वापर न करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला ( Azan Without Loudspeaker Ratnagiri ) आहे. तसेच भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे ( Supreme Court On Loudspeaker Use ) तंतोतंत पालन करणार असल्याचेही मुस्लिम बांधवांनी सांगितले.
शहरातील जामा मशिदीचे अध्यक्ष शकील मूर्तुझा यांनी सांगितलं की, शहरातील मुस्लिम बांधवांची बैठक रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात आयोजित करण्यात आली होती. जवळपास 30 मशिदींचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी उपस्थित होते. या बैठकीत भोंग्याच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेवेळी सकाळची अजान ही भोंग्याचा वापर न करता केली जाईल, त्यानंतरच्या अजान या आवाजाबाबत कोर्टाचे जे निर्देश आहेत त्यानुसार दिल्या जातील. भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांची अंमलबाजवणी केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका आम्ही पोलिसांना सांगितल्याचं मूर्तुझा यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला तर कायदा हातात न घेता पोलिसांना त्याची माहिती दिली जाईल, अशा सूचना सर्व मुस्लिम बांधवांना दिल्या असल्याची माहिती मूर्तुझा यांनी यावेळी दिली.